बदलापूर : बदलापूर येथील आदर्श शाळेत गेल्या आठवड्यात तीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी १२ तास लावले आणि शाळा प्रशासनानेही घटनेकडे दुर्लक्ष केल्याने शहरात संतापाची लाट पसरली. दरम्यान, या प्ररकणातील एका मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणासंदर्भात एफआयआरमध्ये नोंदवलेली माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
एफआयआरनुसार, ही घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान घडली. दोन मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबाला १३ ऑगस्ट रोजी संशय आला, त्यांनी दुसऱ्या मुलीच्या कुटुंबातील सदस्याशी बोलल्यानंतर आपण लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्यास जात असल्याचे सांगितले. यानंतर मुलीच्या पालकांनी तिला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अहवालात तिच्या हायमेनचा भंग झाल्याचे दिसून आले. मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने तिच्या पालकांना सांगितलं की दादाने तिचे कपडे काढून तिच्या गुप्तांगाला स्पर्श केला.



