मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत सद्भावना दिवस मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यासोबतच केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. “काँग्रेस आणि मुंबई यांचं अनोखं नातं होतं. राजीव गांधी यांचा जन्म मुंबईत झाला. पुण्यातील काँग्रेस पक्षाची पहिली बैठक काही कारणास्तव रद्द होऊन मुंबईत झाली होती. इथंच काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्यावेळी महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांती मैदानावर स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका घेतली. त्यावेळी चले जावचा नारा देण्यात आला. काँग्रेसची कार्यकारिणी बैठक याच ठिकाणी पार पडली होती. डिस्कव्हरी ऑफ इंडियाचं लेखणंही पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच मातीतून केलं. काँग्रेस तसंच मुंबई यांचं जवळचं नातं आहे. राजीव गांधी यांनी त्यांचं प्रसिद्ध भाषण मुंबईचं दिलं होतं”, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितली.
“आपल्या देशाला दिशा देणाऱ्या नागरिकांचा आपल्याला अभिमान असायला हवा. पण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना नेहरू कुटुंबाचं नाव घेतल्यावर काय होतं माहीत नाही. त्यांचा पक्ष नेहरू कुटुंबावर कायम टीका करतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी काहीही म्हटलं तरी नेहरू घराण्याचं योगदान कोणीही पुसून टाकू शकत नाही,” असा टोला त्यांनी भाजपाला लगावाला.


