मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबईत रविवारी महाविकास आघाडीने (मविआ) ‘जोडे मारा’ आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीकेचा भडिमार केला. दुसरीकडे उपराजधानी नागपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावरून मविआला लक्ष्य केले.
मविआच्या आंदोलनाला हुतात्मा चौकात सुरुवात झाली. चौकात फलकबाजीला बंदी असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक फलक लावला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर प्रकरण निवळले. दुपारी साडेअकराच्या सुमारास हुतात्मा चौकातून मोर्चा गेट वे ऑफ इंडियाकडे निघाला. मोर्चाला परवानगी नसली तरी पोलिसांनी मज्जाव केला नाही. गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर मविआ नेत्यांनी ‘जोडे मारा’ आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत विरोधकांनी ‘महायुती सरकार चले जाव’ असा नारा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे आजही दिमाखात उभे आहेत. मात्र राजकोट किल्लावरील पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याने (पान ४ वर)
‘जोडे मारा’वरून जुंपली!
तो पडला, अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकारवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली नसती तर, महाराष्ट्राने त्यांना ‘शिल्लक’ ठेवले नसते. या महाराष्ट्रद्रोही सरकारला आता बाहेरचा रस्ता दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. तर शिवद्रोही सरकार राज्यात पुन्हा येऊ देणार नाही, अशी महाराष्ट्रातील जनतेने शपथ घेतल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. या आंदोलनात खा. छत्रपती शाहू महाराज, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह मविआचे अनेक नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज प्रकृती बरी नसतानाही या आंदोलनासाठी आल्याचा उल्लेख पटोले यांनी आपल्या भाषणात केला.
दुसरीकडे, नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मविआच्या या आंदोलनावर टीकेची तोफ डागली. ‘‘कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारच्या काळात गेल्यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी दोन जेसीबीचा वापर करण्यात आला. या अपमानाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांना जोडे मारले पाहिजेत,’’ असा घणाघात शिंदे यांनी केला. जोडे मारा आंदोलन करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनताच जोडे मारेल, असा दावाही त्यांनी केला. तर ‘‘इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्याहून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले असे एक तरी भाषण मविआच्या नेत्यांनी दाखवावे. पंडित नेहरू यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’मध्ये शिवाजी महाराजांबाबत जे लिहिले होते त्याबद्दल ‘मविआ’ माफी मागणार का?’’ असा सवाल फडणवीस यांनी केला. ‘जोडे मारा’ आंदोलन पूर्ण राजकीय आंदोलन असल्याचा आरोपही त्यांनी केला.