
दौंड : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. दरम्यान इच्छुक उमेदवार मतदारसंघात सभा, बैठका घेताना दिसत आहे. जागावाटप ज्या पक्षाकडे जाईल तिकडे उडी मारण्याच्या तयारीत काहीजण आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीत तीन-तीन पक्ष असल्याने जागावाटपाबाबत तिढा निर्माण झाला आहे. एकाला तिकीट दिले तर इतर दोन पक्षातील इच्छुक बंडखोरीच्या तयारीत असणार आहेत. अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दौंड विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. या मागणीमुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून वीरधवल जगदाळे यांची ओळख आहे.
वीरधवल जगदाळे हे दौंड साखर कारखान्याचे संचालक असून त्यांनी दौंड विधानसभा मतदार संघावर दावा केला आहे. भाजपचे नेते राहुल कुल यांचा हा मतदारसंघ आहे . परंतु अशातच आता जगदाळे यांनी केलेल्या मागणीमुळे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेला सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी अशी पहिली मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली होती. ती मागणी मान्य देखील झाली होती. दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाकडे गेल्यास आमदार राहुल कुल यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



