पुणे / बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेली जनसन्मान यात्रा सोमवारी (२ सप्टेंबर) बारामतीमध्ये येणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, राज्याच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरील टीकेला अजित पवार काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे. अजित दादा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत काय भाष्य करणार, याबाबतही बारामतीकरांमध्ये उत्सुकता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संपर्क साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून या यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर यात्रा सोमवारी पवार यांच्या बारामती शहरात दाखल होणार आहे. यानिमित्ताने बारामती शहरामध्ये रोड शो होणार असून त्यासंदर्भातील तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार या वेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
‘बारामती विधानसभा निवडणूक लढविण्यात रस नाही. येथून सात ते आठ वेळा निवडून आलो आहे. त्यामुळे जनतेची मागणी असेल आणि संसदीय समितीने निर्णय घेतला तर, जय पवार यांना बारामतीमधून उमेदवारी दिली जाऊ शकते,’ असे विधान काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर जय पवारही बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार काय बोलणार, याबाबतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, तसेच बारामतीच्या नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळत असून महिलांना निधीचे वाटपही सुरू झाले आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना आणण्यात आली असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यालाही अजित पवार उत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, बारामतीमधील विकासकामांचा आढावा, नवीन पदाधिकारी निवड होण्याची शक्यताही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांकडून वर्तविण्यात आली.