पुणे : राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. बंद कारखाने सुरू करणे, त्यांचे विस्तारीकरण करणे आणि प्रामुख्याने कारखान्यांत इथेनॉल प्रकल्प सुरू करून कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू आहेत.
केंद्रीय सहकार मंत्रालयाने याबाबत स्थापन केलेल्या समितीने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने २०३० पर्यंत देशाचे साखर उत्पादन ४५० लाख टन करण्याचे आणि वर्षाला एक हजार कोटी लिटर साखर कारखाना आधारित इथेनॉल निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सध्या देशाचे साखर उत्पादन ३५० ते ३६० लाख टन आहे. तर इथेनॉल निर्मिती सुमारे ३५० कोटी लिटरच्या घरात आहे. २०२२ – २३ मध्ये एकूण इथेनॉल निर्मिती ५०२ कोटी लिटरवर गेली आहे. त्यात साखर कारखान्यातून उत्पादित इथेनॉलचा वाटा ८० टक्क्यांपर्यंत आहे. एकूण इथेनॉल निर्मितीत बी हेवी मोलॉसिसपासून ६० टक्के, साखरेचा पाक, उसाच्या रसापासून २० टक्के, सी हेवी मोलॉसिसपासून ३ टक्के आणि उर्वरित इथेनॉल उत्पादन मका आणि तांदळापासून तयार होते. डिसेंबर २०२३ पर्यंत देशाची एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता १३८० कोटी लिटरवर गेली आहे. त्यात साखर कारखाना आधारित क्षमता ८७५ कोटी लिटर आणि धान्य आधारित ५०५ कोटी लिटर आहे.
साखर उत्पादन आणि इथेनॉल उत्पादनाची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने देशातील बंद असलेल्या १८० कारखान्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात राज्यातील ३५ हून जास्त कारखान्यांचा समावेश आहे. बंद असलेल्या १८० पैकी देशभरातील २० कारखाने पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे, त्यात राज्यातील दहा कारखान्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.