
मुंबई : महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून अनेकदा चर्चा झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत होते मात्र निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री ठरवला जाईल या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भूमिकेनंतर या चर्चा काहीशा थांबल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता पुन्हा ठाकरे गट मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झाला असून मुख्यमंत्रीपदासाठी नवा प्रस्ताव काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर ठेवल्याची माहिती आहे.
या प्रस्तावानुसार ठाकरे गटाकडून कमी जागांवर लढण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवली आहे. मात्र मुख्यमंत्रीपद ठाकरे गटाला देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसपेक्षा १० जागा कमी लढण्याची तयारी ठाकरे गटाकडून दाखवण्यात आली आहे.२०१९ ला युतीमध्ये १२५ जागांवर शिवसेना लढली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून ९५ जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेसची ११५ जागांची मागणी आहे.
मात्र, त्यांनी १०५ जागा आणि शरद पवार गटाने ८८ जागा लढाव्यात, असा देखील प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेसाठी बैठका होत आहेत. या बैठकीमध्ये ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील काही जागांवरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याची देखील माहिती आहे.



