पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामधील वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. पुण्यामध्ये आज वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजनाचा सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी भाषणादरम्यान फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे केंद्रात मंत्री असलेल्या गडकरींनीही फडणवीसांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत सदर मंजूरी मिळवणारच असं आश्वासन दिलं.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये, पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नामकरण करण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिली जाईल असं जाहीर केलं. पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नामकरण जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेचे स्वागत करत फडणवीसांनी हा निर्णय जाहीर केला आहे. “राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहोत,” असं फडणवीस जाहीर भाषणात म्हणाले.
प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय…
पुण्यातील मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित होता. तो मार्गी लागला याचा आनंद आहे, असं नितीन गडकरी आपल्या भाषणामध्ये म्हणाले. तसेच पुढे बोलताना गडकरींनीही लोहगाव विमानतळाचा उल्लेख केला. “लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. आम्ही केंद्रात पंतप्रधांनाकडून हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही,” असं गडकरी म्हणाले


