मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याच्या निर्णयासह लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन कसे असणार?
राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार आता ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार आहे, त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं मानधन ३ हजारांवरुन ६ हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच उपसरंपचाचे मानधन देखील दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाचं मानधन ४ हजारांवरून ८ हजार रुपये करण्यात आले, तर तेथील उपसरपंचांचं मानधन १५०० रुपयांवरून ३ हजार करण्यात आले. याबरोबरच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ८ हजारांपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचाचं मानधन ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत करण्यात आले आहे, तेथील उपसरपंचाचे मानधन २ हजारांवरून आता ४ हजारांपर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


