लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हांमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दोन्ही चिन्हे समान दिसत असल्याने निवडणुकीत त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाला) बसला होता. त्यामुळे पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह न गोठवता तुतारी चिन्हाचा आकार वाढण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं. दरम्यान, आयोगाच्या या निर्णयानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षातर्फे एक प्रतिनिधी मंडळ निवडणूक आयोगाकडे गेले होते. तेव्हा लोकसभेची निवडणूक नुकतीच संपलेली होती व सातारा येथील आमची जागा केवळ निवडणूक चिन्हाच्या गोंधळामुळेच गेल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला समजावून सांगितले होते. तसेच, मिळालेल्या मतांच्या संख्येचे बलाबलही समजावले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाचे सध्याचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी , “आपली मागणी पूर्णतः रास्त असून संबधित निशाणी रद्द करून देतो”, असे मान्य केले होते. आज मात्र ते चिन्ह रद्द झाले नसल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच, राजीव कुमार हे शिष्टमंडळाशी एक बोलतात आणि निर्णय देताना दुसराच देतात, याचे जरा आश्चर्यच वाटते. याचाच अर्थ असा की, निवडणूक आयोगाचे जे स्वतंत्र अस्तित्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानात अभिप्रेत होतं, ते संपलेले आहे”, अशी टीका त्यांनी केली.