मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आदल्या दिवशी राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलमुक्ती दिली व त्याची मध्यरात्रीपासून अंमलबजावणीही सुरू झाली. मात्र ‘फास्टॅग’ यंत्रणा अद्यायावत न केली गेल्यामुळे पैसे परस्पर कापले गेल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या. त्यानंतर आता टोलमुक्त वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्याबाबत व हलक्या वाहनांचा टोल कापून न घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

मुलुंड, ऐरोली, दहिसर, वाशी, लालबहादूर शास्त्री मार्ग या पाच नाक्यांवरून छोटी वाहने, एस. टी. आणि शाळांच्या बसना टोलमधून सूट देण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घेतला. मात्र मंगळवारी सकाळी ‘फास्टॅग’मधून टोलचे पैसे कापून घेण्यात (पान ८ वर)(पान १ वरून) आल्याचे संदेश चालकांना आले. याबाबत अनेकांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडे आणि समाजमाध्यमांतून नाराजी व्यक्त केली. मुलुंड टोलनाक्यावर छोट्या वाहनांसाठी जास्त मार्गिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. वसुली ठेकेदाराकडून टोल कायम असलेल्या अवजड वाहनांना प्राधान्य देण्यात येत असल्याची तक्रारही काही चालकांनी केली.