
सहा महिन्यात आमचं सरकार पडणार असं ठाकरे म्हणत होते, पण घासून-पुसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असा टोलाही शिंदे यांनी लगावला. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.
हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला आली
शिवसेना बाळासाहेब ठाकरेरुपी हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला आली. हे सरकार 15 दिवस टिकणार नाही, सहा महिन्यात पडेल अशी टीका केली जायची. पण टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे पुरून उरला. घासून पुसून नाही तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा चेला, आनंद दिघेंचा शिष्य आहे.मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे.



