महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  तर आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, सरकारकडून आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याचंही वृत्त पसरलं आहे. काही निवडक महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार असल्याचंही या वृत्तांमधून सांगण्यात आलंय. त्यामुळे हे वृत्त खरं आहे का? याबाबत खरंच शासननिर्णय झाला का? सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलीय.

अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली आहे. आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले. त्यामुळे आता थेट डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात येतील. मात्र, याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, सरकारकडून अजून अडीच हजार रुपये मिळणार असल्याचं वृत्तही काही वृत्तसंकेतस्थळांनी दिलं आहे. त्यामुळे अनेक महिला या अडीच हजार रुपयांची वाट पाहत आहेत. हे पैसे कधी मिळणार याबाबत या वृत्तांमध्ये काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला वर्गांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय.