पुणे : ‘विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुस्लिम आणि अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्व द्यावे. त्यानुसार हडपसर विधानसभा मतदारसंघ मुस्लिम समाजाला द्यावा,’ अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आणि जमियत उलेमा यांच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या पत्रकार परिषदेस रशीद शेख, राहुल डंबाळे, लुकस केदारी, मुफ्ती शाहीद, जाहीद शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ‘लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान वाचविण्यासाठी मुस्लिम आणि अल्पसंख्यांक समाजाने महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. या समाजाला योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्यास महाविकास आघाडीचा मतदार नाराज होण्याची शक्यता आहे. हरियाणा राज्यातील निकालाची पुनरावृत्ती राज्यात होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीने या मागणीचा तातडीने विचार करणे आवश्यक आहे. त्यानुसार निवडणुकीत अल्पसंख्याक आणि मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देताना हडपसर मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि अल्पसंख्यांक समाजाचे नेते रशीद खान यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी,’ अशी मागणी जमियत उलेमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती शाहीद यांनी केली.
‘पश्चिम महाराष्ट्रातून हडपसर मतदारसंघ मुस्लिमांसाठी सुरक्षित असल्याने या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे. या ठिकाणी मिळणाऱ्या उमेदवारीमुळे जवळपास पुणे जिल्ह्यातल्या २१ विधानसभा मतदारसंघांत आणि पश्चिम महाराष्ट्रात सकारात्मक संदेश जाईल,’ असे रशीद शेख यांनी सांगितले.




