
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यातील तीन मतदार संघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. कोथरूड विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेचे खडकवासलाचे पहिले दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयूरेश यांना मनसेने खडकवासल्यातूनच उमेदवारी देऊन महायुती आणि महाविकास आघाडीपुढे आव्हान उभे केले आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातून शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मनसेने दुसऱ्या टप्प्यात उमेदवार जाहीर केले असून, त्यामध्ये पुण्यातील तीन मतदार संघांचा समावेश आहे. कोथरूड विधासनभा मतदार संघातून यापूर्वी तीन वेळा माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा २५ हजार ४९५ मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीत विद्यामान खासदार मेधा कुलकर्णी या विजयी झाल्या होत्या. त्यावेळी शिंंदे हे चौथ्या स्थानावर फेकले गेले होते. २००९ मध्ये त्यांनी चांगली लढत दिली होती. त्यावेळी तत्कालीन शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मोकाटे आणि शिंदे यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये शिंदे यांचा पराभव झाला होता. आता चौैथ्यांदा ते नशीब आजमावणार आहेत.
इतिहासाच्या पुनरावृत्तीची संधी
‘सोनेरी आमदार’ अशी प्रतिमा झालेले मनसेचे खडकवासलाचे पहिले आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर मागील निवडणुकीमध्ये मनसेने या मतदार संघात उमेदवार उभा केला नव्हता. आता त्यांचे पुत्र मयूरेश यांना मनसेने संधी देऊन इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.



