
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्याच्या प्रक्रियेने गती घेतली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडाचे झेंडे रोवले जात आहेत. इचलकरंजी व चंदगडमध्ये दोन्हीकडे तर कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले येथे एका पक्षात बंडखोरी निश्चित असून ती रोखणे दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान असणार आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत कोल्हापूर दक्षिणमध्ये माजी आमदार अमल महाडिक तर इचलकरंजीत राहुल आवाडे यांचा समावेश आहे. आवाडे यांना उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून भाजपमधील एक गट नाराज होता. याची चुणूक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दिसली. त्यांची पाठ वळताच माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी आवाडे यांच्या उमेदवारीला विरोध करीत अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केल्याने भाजपमधील पहिली बंडखोरी पुढे आली. शुक्रवारी भाजप कार्यालयात आवाडे पिता पुत्रांच्या प्रवेशावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शेळके यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आवाडे यांच्या उमेदवारीबाबत एक वर्ग पडद्याआडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने वा राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांना पाठबळ देण्याची शक्यता आहे. एकूणच नाराज ह्यविठ्ठलाचा झेंडाह्ण हाती घेतील अशा हालचाली आहेत. याच मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादीकडून मदन कारंडे तर काँग्रेसकडून शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी उमेदवारीचा प्रबळ दावा केला असताना संजय तेलनाडे यांची बंडखोरी अटळ मानली जात आहे.
चंदगडमध्ये सत्तारूढ आणि विरोधकांत बंडाचे वारे जोमाने वाहत आहे. अजित पवार यांनी आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गतवेळचे बंडखोर शिवाजी पाटील यांच्या नावाची घोषणा केल्याने महायुतीत ठिणगी पडली आहे. येथे शिवाजी पाटील यांची बंडखोरी अटळ आहे. दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादीकडून विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या कन्या नंदा बाभुळकर यांना विरोध करीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते एकवटलेले आहेत. बंडखोरांपैकी एकास उभे करून सांगली पॅटर्न राबवण्याची खलबते सुरू आहेत.


