सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी खासदार नीलेश राणे तब्बल २० वर्षांनी पुन्हा ‘धनुष्यबाण’ हाती घेणार आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार असू शकतात. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
विधानसभेच्या जागा वाटपात कुडाळ मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटासाठी सोडला जाणार आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार नव्हता. त्यामुळे नीलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी देण्याचे नियोजन महायुतीने केले आहे. खासदार नारायण राणे आणि नीलेश राणे यांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर नीलेश यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून नीलेश राणे यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात भाजपाची बांधणी केली आहे. याचे सकारात्मक परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. कुडाळ मतदारसंघातून खासदार नारायण राणे यांना २६ हजार १३६ मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आग्रही होते. मात्र महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने, नीलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन ‘धनुष्यबाणा’वर निवडणुकीत उतवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


