नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींचे केंद्र ठरलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात ( शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. संदीप यांच्या प्रवेशामुळे या मतदारसंघात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. संदीप यांना बेलापूरमधून उमेदवारी मिळणे निश्चित मानले जात असून माजी मंत्री गणेश नाईक हे ऐरोलीतून् भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील राजकीय परिस्थिती विचित्र बनली आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी नाकारल्याने गेल्या काही दिवसांपासून संदीप यांनी बंडाची भूमीका घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार अशी भूमीका त्यांनी घेतल्याने मंगळवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांच्या समर्थकांनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत नाईक समर्थकांनी ‘तुतारी’ हाती घ्यावी अशी मागणी करण्यास सुरुवात केली होती. तेव्हाच संदीप हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील हे स्पष्ट झाले. दरम्यान दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जयंत पाटील यांचे भावे नाट्यगृहात आगमन झाले आणि त्यांच्या उपस्थितीत संदीप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
‘शब्द फिरवला गेला, माझी कोंडी झाली २०१९ मध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाल्याने आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. नवी मुंबईच्या विकासासाठी आम्ही तो निर्णय घेतला होता. सत्तेत राहीलो तर शहराचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा होती. परंतु आम्हाला दिलेला शब्द पाळला गेला नाही. त्यामुळे माझी कोंडी झाली. माझी कोंडी झाली तरी शहराची, कार्यकर्त्यांची कोंडी होताना पहाणे शक्य नव्हते. त्यामुळे पक्षांतराचा निर्णय घेतला,’ असे संदीप यांनी यावेळी सांगितले.


