
सांगली विधानसभेच्या जागेवरून काँग्रेसच्या दोन गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरूच आहे. अद्यापही तिकिट जाहीर करण्याचा निर्णय होत नसल्याने दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन पक्षश्रेष्ठींना इशारा दिला आहे. तिकीट नाकारल्यास जयश्रीताई समर्थकांनी बंडखोरी आणि पृथ्वीराज पाटील समर्थकांनी लोकसभेप्रमाणे अपक्ष उमेदवारीचा ‘सांगली पॅटर्न’ राबविण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा वाद टोकाला गेल्याचे चित्र आहे .दुसरीकडे जयश्रीताई पाटील यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
स्वाभिमानी सांगलीकरांच्या साथीने निवडणूक लढवू
काँग्रेस पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली नाही, तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करून ‘सांगली पॅटर्न’ राबवू. स्वाभिमानी सांगलीकरांच्या साथीने निवडणूक लढवू, असा इशारा पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांनी बैठकीत दिला. दहा वर्ष पक्ष जिवंत ठेवणाऱ्या आणि पाच वर्षे मेहनत घेणाऱ्या नेत्याला डावलून पक्षाने आत्मघात करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. याआधी माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी दोन्ही इच्छुक उमेदवारांमध्ये एमकत करण्यासाठी आणि दोन दिवस बैठक घेतली. परंतु, दोघेही निवडणूक लढविण्यार ठाम असल्याने उमेदवारीचा निर्णय मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात सोडला आहे. वरिष्ठांकडून अद्याप उमेदवारीचा निर्णय जाहीर होण्याच्या अगोदरच जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील समर्थकांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सांगली विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा आणखी वाढला आहे. त्यातून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
सांगलीत भाजपकडून दोन उमेदवार घोषित
दरम्यान, महायुतीमधील कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला येणार याची चर्चा अजून सुरूच असताना सांगलीमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांना पाचव्यांदा पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. भाजपच्या पहिल्या यादीत सुरेश खाडे यांना मिरजमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुरेश खाडे गेल्या काही वर्षांपासून मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध खात्यांचा कारभार पाहिला आहे. सध्याच्या महायुती सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते.
सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी उमेदवारी
सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून चार वेळा बाजी मारली असून पाचव्यांदा आमदार होण्यासाठी त्यांच्यामसोर आव्हान असेल. दुसरीकडे, आमदार सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली आहे. सांगली विधानसभेमध्ये सलग दोनवेळा सुधीर गाडगीळ यांनी विजय मिळवला आहे. मात्र, हॅट्ट्रिकची संधी असताना त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय जाहीर केला होता. गाडगीळ यांच्यासमोर सक्षम पर्यायाची चाचपणी भाजपकडून सुरु आहे. ते शक्य न झाल्यास भाजपकडून पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती.



