
आगामी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच काही पक्षांनी आपल्या याद्या जाहीर केल्या आहेत. अशातच मनसेनं आपली दुसरी यादी जाहीर केली असून माहीम विधानसभा मतदारसंघातून आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीममधून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर म्हणजे, शिवसेनेचे प्रबळ नेते आणि ठाकरेंचे विश्वासू… पण शिवसेनेतील फुटीनंतर सरवणकर यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. गेल्या बऱ्याच वर्षापासून माहीम मतदारसंघावर सरवणकर यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. अशातच, प्रबळ, अनुभवी अशा सरवकरांशी निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरेंचा सामना होणार आहे.
आजवर शिवसेनेच्या तिकीटावर एकदाही सदा सरवणकर पराभूत झालेले नाहीत. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. काही दिवसांपूर्वीच सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे सदा सरवणकर सध्या शिंदे गटात आहेत. शिंदेंकडून सरवणकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.
पक्षफुटीनंतर गोळीबार प्रकरणात सरवणकरांचं नाव
साधारणतः दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. त्यावेळी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती. याच राड्यामुळे सदा सरवणकरांची मंत्रिपदाची संधी हुकल्याचं बोललं जात होतं. परिणाम कालांतरानं सदा सरवणकरांच्या गळ्यात मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली.
शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवलीत. माहीम, दादरचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचं शिवधनुष्य सदा सरवणकरांनी अनेक वर्ष पेललं आहे. शिवसेनेत असताना सरवणकरांनी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष यांसारखी अनेक महत्त्वाची पदं भूषवलीत. तसेच, सरवणकर सर्वात आधी नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर सरवणकरांनी शिवसेनेकडूनच आमदारकीची निवडणूक लढवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असणाऱ्या सदा सरवणकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंची साथ दिली. ठाकरेंच्या विश्वासूंपैकी एक असणारे आमदार सदा सरवणकर ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले.



