
जळगाव : राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही तुटला नसून मविआतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून उर्वरीत उमेदवारांच्या यादीबाबत आज दिल्लीत बैठक होऊन नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे, ज्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, ते उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राज्यात आज बहुतांश उमेदवांरांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये, मुक्ताईनगर मतदारसंघातून माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची यादी जाहीर झाली नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर, एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीतील पक्षांच्या यादीचा मुहूर्त सांगितला.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महाविकास आघाडीत सुरुवातीपासून सुरु असलेला गोंधळ आता शिगेला पोहोचला आहे. मविआच्या बुधवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत 85-85-85 असे जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अजून अंतिम जागावाटप झाले नसून आम्ही 100 पेक्षा जास्त जागा लढू असा दावा केला होता. मात्र, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत काँग्रेसच्या 100 जागा लढण्याच्या दाव्याची आपल्या पद्धतीने वासलात लावली. तर, शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीतही काही उमेदवार बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी अद्यापही काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच, आता एकनाथ खडसेंनी यादीचा मुहूर्त सांगितला आहे.
रोहिणी खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना विद्यमान महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीच्या माध्यमातून रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला असून मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला. देशात महागाई प्रचंड वाढली असल्याने जनतेमध्ये रोष आहे, सरकारचं देणं थकलं आहे झाली आहे, अनेक योजनांचे पैसे अद्याप मिळू शकले नाहीत, मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असून, या महागाईचा मोठा फटका महायुतीला बसणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
यादी उद्या जाहीर होईल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावरून रोहिणी खडसे प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास मुलीच्या विजयाबाबत एकनाथ खडसेंनी व्यक्त केला. तसेच, राज्यात महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांवर भाष्य करताना महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांची यादी उद्या यादी जाहीर होऊ शकते, असेही खडसेंनी म्हटले.



