मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेल्या 65 उमेदवारांच्या पहिल्या यादीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्रपक्ष शेतकरी कामगार पक्षाने दावा केलेल्या 12 जागांवर उमेदवार जाहीर केली. निफाड, गेवराई, लोहा, भूम परांडा, सांगोला, रामटेक, अकोला पूर्व, वणी, सोलापूर दक्षिण, पाटण, ऐरोली आणि नाशिक मध्य अशा 12 मतदारसंघांमध्ये ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत.
या मतदारसंघांबाबत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या पक्षाने या ठिकाणी उमेदवार जाहीर केल्याने गोंधळ उडाला. आघाडीत तेढ निर्माण होण्यास हेच 12 मतदारसंघ कारणीभूत ठरत असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरेंनी इतर मित्रपक्षांबरोबर चर्चा न करता या 12 जागांवर थेट उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा वेग मंदावल्याचं सांगितलं जात आहे.
शेकापची कोंडी करण्याचा प्रयत्न
एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघात शेकापचे बाबासाहेब देशमुख इच्छुक होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापला ही जागा देशमुख यांच्यासाठी हवी होती. शिवसेना ठाकरे यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून आयात केलेल्या दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली. शेकापवर अशा प्रकारची कुरघोडी लोहा मतदारसंघातही करण्यात आली. या मतदारसंघात सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे शेकापच्या तिकिटावर विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीतही ते शेकापकडून लढण्यास इच्छुक होते. त्यांच्या या इच्छेचा विचार न करता त्यांच्या जागी 2014 मध्ये भोसरी मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढलेल्या एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ठाकरेंच्या पक्षाने या मतदारसंघात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राजेंद्र मुळक यांना डावलून थेट विशाल बरबटे यांची उमेदवारी जाहीर केली. अकोला पूर्व मतदारसंघात गोपाल दातकर यांना उमेदवारी जाहीर झाली. या ठिकाणी पूजा काळे व कपिल ढोके या काँग्रेसच्या उमेदवारांनी दावा केला होता. वणी मतदारसंघात संजय दरेकर या नवख्या उमेदवाराला ठाकरेंनी निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली. या ठिकाणी काँग्रेसचे वामनराव कासावर हे गेली अनेक वर्ष इच्छुक उमेदवार असताना ठाकरेंनी थेट उमेदवारी जाहीर केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.



