
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
रशियाला युक्रेनविरोधी युद्धात मदत केल्याबद्दल आणि निर्बंधांमधून पळवाटा मिळवून दिल्याबद्दल अमेरिकेने १९ भारतीय खासगी कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या वित्त आणि परराष्ट्र विभागाने डझनभर देशांतील ४०० कंपन्यांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा उगारला असून ही आतापर्यंत केलेली सर्वांत मोठी कारवाई आहे.
युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिका, युरोपसह संयुक्त राष्ट्रांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र विविध देशांमधील खासगी कंपन्यांचे रशियाशी व्यवहार होत असून त्यामुळे पुतिन प्रशासनाला निर्बंधांमधून पळवाटा मिळत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारतासह चीन, संयुक्त अरब अमिराती, तुर्कस्तान, थायलंड, मलेशिया, स्वित्झर्लंड यासह अन्य काही देशांमधील रशियाला साहाय्यभूत होणाऱ्या २७४ कंपन्यांची यादी अमेरिकेच्या वित्त विभागाने प्रसिद्ध केली. तर परराष्ट्र विभागाने १२० आणि वाणिज्य खात्याने ४० कंपन्यांना यादीत टाकले असून एकाच दिवसात तब्बल ४३४ कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लावले आहेत. भारतात अनेक उदयोन्मुख व्यवसाय असून या मार्गावर (रशियाला मदत करण्याच्या) जास्त पुढे जाण्यापूर्वी त्यांना थांबावे यासाठी आम्ही थेट आणि स्पष्टपणे बोलत आहोत, असे अमेरिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.




