
वॉशिंग्टन/मुंबई : चुरशीच्या लढतीविषयीचे सारे अंदाज फोल ठरवत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांचा सहज पराभव केला आणि दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनण्याचा मान मिळवला. महाभियोग, विविध फौजदारी खटले, बुद्धिजीवींकडून होणारी टीका, महिलांविषयी हीन टिप्पणी, हत्येचे प्रयत्न असे अनेक घटक ट्रम्प यांचा आत्मविश्वास तोडू शकले नाहीत आणि त्यांना असलेला जनाधार घटवू शकले नाहीत. अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष म्हणून ते जानेवारी महिन्यात शपथ घेतील.
गेल्या खेपेस डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात असलेली पेनसिल्वेनिया, जॉर्जिया आणि विस्कॉन्सिन ही मोक्याची राज्ये (स्विंग स्टेट्स) ट्रम्प यांच्या झंझावाताने रिपब्लिकन पक्षाकडे खेचून आणली. त्यामुळे गेल्या वेळी जो बायडेन यांना या राज्यांतून मिळालेली ४५ प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल वोट्स) ट्रम्प यांच्याकडे सरकली. ती निर्णायक ठरली. याशिवाय नॉर्थ कॅरोलिना हे राज्य आपल्याकडेच राखण्यात त्यांनी यश मिळवले.
हॅरिस यांच्या प्रचारयंत्रणेने लोकशाही, गर्भपात, अर्थव्यवस्था, ट्रम्प यांची महिलांविषयीची मते या मुद्द्यांवर भर दिला. पण स्थलांतरितांविषयी ट्रम्प यांनी उठवलेले रान, हत्येच्या प्रयत्नांमुळे त्यांना मिळालेली सहानुभूती, चाचपडत्या बायडेनना ऐनवेळी बदलून हॅरिस यांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे पुरेशा तयारीचा अभाव हे घटक रिपब्लिकन मतदारांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडून गेले. पारंपरिक ज्येष्ठ, गोरे, ग्रामीण व निमशहरी मतदार राखतानाच ट्रम्प यांनी लॅटिनो व आफ्रिकन पुरुष, पदवी नसलेला युवा वर्ग असे नवे मतदार जोडले. याउलट मोठ्या प्रमाणावर महिलांचा पाठिंबा विजयामध्ये परिवर्तित करण्यात कमला हॅरिस अपयशी ठरल्या. तसेच, त्यांना मुस्लीम मतदारांच्या रोषाचा फटकाही बसला. नव्याने आणि अचानक उमेदवारी स्वीकारावी लागल्यामुळे आर्थिक धोरणे, आंतरराष्ट्रीय धोरणे यांविषयी नेमकी भूमिका मांडण्यात त्या अपयशी ठरल्या. आपली भारतीय-आफ्रिकी पार्श्वभूमी व त्या माध्यमातून (पान २ वर) (पान १ वरून) स्थलांतरितांची यशोगाथा कथन करण्याचे त्यांचा पवित्रा ट्रम्प यांच्या टोकाच्या स्थलांतरितविरोधी प्रचारासमोर फिका पडला.
ट्रम्प यांचा अमेरिकेतही आजही प्रचंड जनाधार असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. सलग तीन निवडणुकांमध्ये ट्रम्प लढले. त्यांतील त्यांनी दोन जिंकून दाखवल्या. दुसऱ्या प्रयत्नात ते अमेरिकेचे सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष म्हणून निवडून आले. यंदाच्या त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ प्रातिनिधिक मते नव्हे तर प्रत्यक्ष मतेही त्यांना हॅरिस यांच्यापेक्षा अधिक मिळाली. २००४नंतर प्रथमच अशा प्रकारे रिपब्लिकन उमेदवाराला डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत.




