मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिन्याला २१०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेतपिकाच्या किमान आधारभूत किंमतीवर २० टक्के अनुदान, किसान सन्मान योजनेतून वर्षाला १५ हजार रुपये आणि वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना महिन्याला २१०० रुपये अशी विविध आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीने ३६ पानांच्या आपल्या जाहिरनाम्यास ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ म्हटले असून यामध्ये एकूण ११ आश्वासने देण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी लढवत असलेल्या सर्व ५२ मतदारसंघात आज एकाचवेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ तसेच ५२ मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार दूरदृश्यप्रणालीद्वारे जाहिरनामा प्रकाशनात सहभागी झाले होते. मुंबईत निवडणुकीचा जाहीरनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते बुधवारी गरवारे क्लब येथे प्रकाशित करण्यात आला. महायुतीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांत बदल घडवणाऱ्या योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी कसोशीने करण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून महायुती सरकारने उत्तम पध्दतीने केला असून पुढेही केला जाईल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिली.
जाहिरनामा प्रकाशनास पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, तारांकीत प्रचारक सयाजी शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, कोषाध्यक्ष व आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.
● लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार तसेच महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांना पोलीस दलात समावेश करणार.
● शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १५हजार रुपये देणार.
● शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेतपिकाच्या किमान आधारभूत किंमतीवर २० टक्के अनुदान.
● वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला २१०० रुपये रुपये देणार.
● जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
● २५ लाख रोजगार निर्मिती तसेच १० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला १० हजार रुपये विद्यावेतन देणार.
● ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्ते बांधणार.
● अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला १५ हजार रुपये वेतन.
● वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय उर्जेवर भर देण्यात येईल.
● सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या नव महाराष्ट्र दृष्टिकोन जाहीर करणार.
● धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देणार.



