
मुंबई – माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली. प्रमोद महाजन यांची हत्या गृहकलहामधूनच झाल्याची त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. मात्र, प्रमोद महाजन यांची कन्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी वडिलांची हत्या ही कौटुंबिक विषय किंवा द्वेष भावनेपोटी नव्हती, असा दावा केला. ते एक मोठं षडयंत्र होतं, असा दावा एका माध्यमांशी बोलताना केला.
माजी खासदार पूनम महाजन यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे केले आहेत. पूनम महाजन यांनी म्हटलं, “माझ्या वडिलांची हत्या झाली तेव्हा हा कौटुंबिक विषय असल्याचं चर्चा होती. मात्र, प्रमोद महाजन यांची राजकीय कारकीर्द पुढे जाऊ नये, यासाठी षडयंत्र होते. त्यांना रोखण्यासाठी संपवण्यात आले. एवढेच नाहीतर माझे लोकसभेच्या वेळी तिकीटही कापण्यात आलं. तेही एक मोठं षडयंत्र होतं. पण हे षडयंत्र कोणी रचलं? हे असं कोणी का केलं? याच्या शोधात मी बसत नाही. मात्र, हे षडयंत्र आज नाही तर उद्या एक दिवस बाहेर येईल.” मी माझ्या कामाला प्राधान्य देते असेही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.
पुरावे सादर करावे… पूनम महाजन यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. “जर त्यांच्याकडे काही पुरावे किंवा तसे कागदपत्र असतील तर त्यांनी ते सरकारला द्यावे. सरकार त्याची नक्कीच चौकशी करेल. याच्यात कोण जर दोषी असेल तर त्याच्याही कारवाई करण्यात येईल, असे मुनंगटीवार यांनी म्हटलं आहे.



