पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. भाजपा नवाब मलिक यांचं काम करणार नसल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनदेखील नवाब मलिक यांना विरोध होतोय. अशातच आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, नवाब मलिक आमचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यामुळे मी त्यांच्या रॅलीमध्ये जाणार आहे. त्यांच्यावर फक्त आरोप झालेत, ते सिद्ध झालेले नाहीत म्हणून त्यांना दोषी कसे ठरवता. उपमुख्यमंत्र्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार असल्याचं यावेळी अजित पवारांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत विचारलं असता ते बोलत होते.
अनेक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळतायत. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, दोन-तीन ठिकाणी अशा पद्धतीने घडला आहे, ते कमी करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करीत होतो. काही ठिकाणी फॉर्म राहिले आहेत. भोरमध्ये अधिकृत उमेदवार नाही, पण पुरंदरमध्ये अधिकृत उमेदवार आहे. श्रीरामपूर, सिंदखेड राजा आणि देवळालीमध्ये उमेदवार आहेत, याबद्दल आमची चर्चा झालीय. आज किंवा उद्यापासून यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही यावेळी अजित पवार म्हणालेत.


