संभाजीनगर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील मतदारसंघात जागावाटपावेळीच अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. ऐनवेळी, माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुन कन्नड विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळवली. तर, औरंगाबाद मध्य मतदारसंघात ऐनवेळी ठाकरेंच्या उमेदवाराने अंग काढून घेतल्यान येथेही उमेदवार बदलण्यात आला आहे. दुसरीकडे महायुतीमधील रावसाहेब दानवे व मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातही चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, मराठवाड्यातील लढतींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यात, सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पुन्हा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आता, त्यांच्या मतदारसंघातील लढतीवरुन दोन कार्यकर्त्यांमध्ये पैजेचा विडा लागला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्या निवडणुकीवर पैज लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे 500 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून ही पैज लागली असून निवडणूक लिडवरुन ही शर्यत लावण्यात आली आहे. नदीम (दादा) शेख आणि अब्दुल कुरेशी या दोन कार्यकर्त्यांमध्ये ही पैज लावण्यात आली आहे. त्यानुसार, पैज जिंकणाऱ्याला नवी बुलेट गाडी देण्याचं वचन या पैजेतून करण्यात आलंय. महाराष्ट्रात सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना कोण निवडून येणार यावरती चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये एक अनोखी पैज लावण्यात आली आहे. सिल्लोड मतदारसंघातील सोयगाव मतदारसंघातून अब्दुल सत्तार कितीच्या लीडनं निवडून येणार यावरती ही पैज लावली आहे. बॉण्ड पेपरवर लिहून पैज लावण्यात आलीय, शेख नदीम आणि अब्दुल कुरेशी यांच्यामध्ये पैज ही पैज लागली आहे. ही पैज जिंकणाऱ्याला बुलेट गाडी मिळणार आहे. शेख नदीम यांच्यामते अब्दुल सत्तार हे 30 ते 40 हजारांच्या मतांनी निवडून येतील. तर, कुरेशी यांच्यामते 10 ते 20 हजार मतांनी विजयी होतील. त्यावरुन दोघांमध्ये थेट बुलेटची प्राईज लागली आहे.
पैज लावणे कायद्याने गुन्हा
सिल्लोड मतदारसंघात शिवसेना महायुतीकडून अब्दुल सत्तार विरुद्ध शिवसेना (युबीटी) महाविकास आघाडीकडून सुरेश बनकर यांच्यात थेट लढत होत आहे. त्यामध्ये, अब्दुल सत्तार हे विजयी होतील, असा विश्वास शर्यत लावणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांना आहे. मात्र, किती मताधिक्यांनी ते निवडून येतील, यासाठी ही पैज लागली आहे. दरम्यान, कायद्याने अशाप्रकारच्या पैज लावणे हा गुन्हा आहे, त्यामुळे पोलीस या पैजेकडे कसं पाहतात हेही महत्त्वाचे आहे.