माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. ही या प्रकरणातील १७ वी अटक आहे. या प्रकरणी आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने गौरव विलास आपुणे (वय २३) याला गेल्या आठवड्यात अटक केली होती. तो कर्वे नगर, पुणे येथील रहिवासी आहे. हल्ल्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झालं आहे. फरार आरोपींनी त्याला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले होते. पाठोपाठ आता आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून पळून गेलेला आरोपी शिवकुमार गौतम उर्फ शिवा याला रविवारी (१० नोव्हेंबर) अटक करण्यात आली.

गोळीबारानंतर शिवा पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याला व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. मात्र त्यांना मुंबईत परतण्याऐवजी शिवकुमारला घेऊनच या असं सांगण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, उपनिरीक्षक स्वप्नील काळे, हवालदार विकास चव्हाण व हवालदार मंगेश सावंत यांनी बाहराइचमधून शिवकुमारला अटक केली व मुंबईला घेऊन आले. गेल्या कित्येक दिवसांपासून बाहराइचमध्ये जातीय हिंसाचार चालू आहे. या गंभीर परिस्थितीतही मुंबई पोलिसांमधील हे चार जवान तब्बल २५ दिवस बाहराइचमध्ये राहीले. अनेक दिवस त्याचा माग काढून त्याला पकडून मुंबईला घेऊन आले आहेत.