महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. आजपासून ९ दिवसांनी महाराष्ट्रभरात हजारो मतदानकेंद्रांवर व्यापक प्रमाणावर मतदान होत असेल. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि गेल्या सहा महिन्यांपासून उत्सुकता शिगेला पोहोचलेला निकाल हाती येईल. राज्यात इतर निवडणुकांपेक्षा यंदाची विधानसभा निवडणूक राजकीयदृष्ट्या वेगळी ठरली आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होईल? याबाबत उत्सुकता ताणली गेली असताना त्यावर सुप्रसिद्ध लेखक, गुंतवणूकदार व राजकीय भाष्यकार रुचिर शर्मा यांनी भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रातील अभूतपूर्व राजकीय स्थिती

रुचिर शर्मा यांनी विधानसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र दिसू शकेल? याबाबतचा तर्क मांडला आहे. त्याला आधार देण्यासाठी काही तथ्येदेखील दिली आहेत. पण त्याआधी राज्यातील सध्याची राजकीय स्थिती काय आहे? याचा अंदाज आवश्यक ठरतो. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांमध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांत उभी फूट पडली. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. एकनाथ शिंदे अवघ्या ४० आमदारांनिशी राज्याचे मुख्यमंत्री झाले. नंतर आलेल्या अजित पवारांकडेही ४० आमदार होते. त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं. पण पक्षफुटीमुळे महाराष्ट्रात वेगळंच त्रांगडं उभं राहिलं आहे.

सध्या पक्षफुटीमुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचे प्रत्येकी एकेक गट सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंना आहेत. हे दोन गट वगळता दोन्ही बाजूंना उर्वरीत तिसरे आणि महत्त्वाचे दोन्ही पक्ष हे राष्ट्रीय आहेत. एकीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष तर दुसरीकडे विरोधी गटात काँग्रेस. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रात भाजपाला धोबीपछाड देत १३ जागा जिंकून राज्याला सर्वात मोठा पक्ष ठरण्यापर्यंत मजल मारली. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंनी ९ तर शरद पवारांनी ८ जागा जिंकून आणल्या. मविआचे ३० खासदार निवडून आले. सांगलीत विशाल पाटलांनीही विजयानंतर काँग्रेसलाच पाठिंबा दिला. त्यामुळे सध्या ४८ पैकी ३१ लोकसभा मतदारसंघ मविआच्या ताब्यात आहेत. प्रत्येकी ६ विधानसभा मतदारसंघ म्हटले, तर राज्यात १८६ विधानसभा मतदारसंघांसाठी विरोधकांचे खासदार आहेत!

पण खासदार जरी विरोधकांचे असले, तरी विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र असल्यामुळे काही ठिकाणी सत्ताधारी तर काही ठिकाणी विरोधक प्रभावी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात विधानसभेचं चित्र नेमकं काय असेल? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यावर इंडिया टुडेला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये रुचिर शर्मा यांनी भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात काय होणार?

रूचिर शर्मा यांच्यामते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीचीच पुनरावृत्ती होईल! फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर झारखंडमध्येही लोकसभेसारखेच निकाल दिसतील, असं ते म्हणाले आहेत. “भारतातल्या निवडणुकांमध्ये एक प्रकारचा पॅटर्न दिसतो. ज्या ज्या वेळी भारतात लोकसभा व विधानसभा निवडणुका ६ ते १२ महिन्यांच्या अंतरात घेतल्या जातात, तेव्हा राज्यातल्या निवडणुकांमध्ये लोकसभेचाच ट्रेंड पाहायला मिळतो”, असं ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

पक्ष लढवलेल्या जागा जिंकलेल्या जागा स्ट्राईक रेट (टक्के)
काँग्रेस १७ १३ ७६.४७
ठाकरे गट २१ ४२.८५
पवार गट १० ८०
एकूण ६२.५
भाजपा २८ ३२.५
शिंदे गट १५ ४६.६
पवार गट २०
रासप
एकूण ३५.४२