राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र राज्यात इतरही अनेक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसेचे काही उमेदवार सध्या चर्चेत आहे. प्रामुख्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे यंदा विधानसभा निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांचीदेखील बरीच चर्चा होत आहे. अमित ठाकरेंमुळे मुंबईतील माहिम मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. अमित ठाकरेंसाठी स्वतः राज ठाकरे सभा घेत आहेत. तसेच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित यांच्या पत्नी मिताली व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य जोरदार प्रचार करत आहेत. या प्रचारादम्यान, त्यांच्याकडून वेगवेगळ्या टिका-टिप्पण्या ऐकायला मिळत आहेत. तसेच अमित ठाकरेंचे विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

माहीममधील शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार महेश सावंत यांनी अमित ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. तसेच सावंत यांनी अमित ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टिप्पणी केली आहे. “महाराष्ट्रात आमची सत्ता आल्यावर आम्ही मशिदींवरील अवैध भोंगे काढू” अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मनसेचे माहीमचे उमेदवार अमित ठाकरे यांनीही त्या वक्तव्याचा पुनरुच्चार केल्यानंतर त्यावर महेश सावंत म्हणाले, “मी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याइतका मोठा नेता नाही. मी एक सामान्य शिवसैनिक आहे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते व प्रवक्ते त्यावर बोलतील. तसेच अमित ठाकरेच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नही. अमित ठाकरेला राजकारणातलं काही कळतं का? तो बालिश आहे. काहीही बोलू शकतो. त्याच्या प्रश्नांकडे व उत्तरांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.