पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करून ‘मतपेरणी’ करण्याचा, पण अतिवृष्टीमुळे गमावलेला मुहूर्त भाजपने पुन्हा एकदा साधला असून, आज, मंगळवारी (१२ नोव्हेंबर) सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधानांची सभा होत आहे. या निमित्ताने महायुतीच्या शहरातील उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हुकलेल्या सभेची कसर या सभेच्या माध्यमातून भरून काढण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा निर्धार आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेअंतर्गत शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रोमार्गिकेचे भूमिपूजन मोदी यांच्या उपस्थितीत होणार होते. त्या निमित्त मोदी यांची सभाही होणार होती. मात्र, अतिवृष्टीचा इशारा आणि त्यातून होणारी वाहतूककोंडी, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा काही तास आधी रद्द करण्यात आली. त्यानंतर मोदी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन आणि उद्घाटन झाले. त्यावरून विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
पवारांवर टीका करणार का?
लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी यांची रेसकोर्स येथे जाहीर सभा झाली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर रेसकोर्स येथे सभा घेणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरले होते. मात्र, विस्तीर्ण मैदानामुळे नागरिकांची उपस्थिती कमी जाणवत होती. त्यावरून विरोधकांनी टीकाही केली होती. ही बाब लक्षात घेऊन आता मध्यवर्ती भागात सभा होत आहे. रेसकोर्स येथील सभेत मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला होता. त्याचे तीव्र पडसादही उमटले होते. त्यामुळे मोदी या सभेत पवार यांच्यावर टीका करणार का, याबाबतही उत्सुकता आहे.



