
पुणे : शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची प्रचारावेळी बॅग तपासण्यावरून वाद सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगचीही तपासणी बारामती येथे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यातील प्रचारसभेवेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्याचे चित्रीकरण करून ठाकरे यांनी त्यावरून टीका केली होती. त्यामुळे बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगेची तपासणीही बारामती येथे करण्यात आली. स्वत: अजित पवार यांनी त्याबाबतची चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित केली.
अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात बुधवारी जाहीर सभा झाल्या. जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे प्रचार सभेसाठी ते हॅलिकॉप्टरने येताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या हॅलिकॉप्टरची, तसेच बॅगेची तपासणी केली. दूरध्वनीवर संभाषण करत पवार यांनी बॅगा तपासणीसाठी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांपैकी एका बॅगेमध्ये चकली होती. बॅगेतील चकल्या हातात घेऊन त्या अधिकाऱ्यांनी खाव्यात, अशी टिप्पणी या वेळी अधिकाऱ्यांकडे केली. बॅगेतील अन्य एका डब्यात पैसे नाहीत ना याची खात्री करा, असेही पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.



