पुणे : सरकारी नोकरी म्हणजे रोजगार, असा काँग्रेसच्या युवराजांचा समज झाला आहे. त्यांना खासगी क्षेत्रात दिवसेंदिवस होणारी वाढ दिसत नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नाव व न घेता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. देशात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक वाढत असून रोजगारनिर्मितीही वाढली आहे. महाराष्ट्र त्यामध्ये अव्वलस्थानी असून, महायुती सरकारच्या काळात हे बदल घडले आहेत. मात्र, केवळ निवडणुकीच्या तोंडावर उद्याोगधंदे स्थलांतरित होत आहे, असा आघाडीचा प्रचार सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत गोयल बोलत होते. भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, कुणाल टिळक आदी उपस्थित होते. गोयल म्हणाले, ‘उद्याोगजगतात मोदी सरकार आल्यानंतर आमूलाग्र बदल झाले आहेत. उद्याोग व्यवसाय, स्टार्ट अप्स, पायाभूत सुविधांची कामे या सर्वांमुळे व्यवसाय-नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. जगभरात कौशल्याला मागणी असून, कौशल्य प्रशिक्षणावर केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारने भर दिला आहे. त्यातही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत. भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल.’
महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाचा कार्यकाळ आणि शिंदे मुख्यमंत्री असतानाचा कार्यकाळात झालेला विकास अनुभवला आहे. याच जनतेने महाविकास आघाडीच्या काळात मंदावलेली विकासाची गतीही अनुभवली आहे. उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ पाहून ते सरकार पुन्हा नको, हे जनतेला कळून चुकले आहे. निवडणुकीनिमित्त मी राज्यभर फिरत असून, सर्वत्र महायुतीला कल्पनेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईत महायुती मोठा विजय प्राप्त करेल, असा दावाही गोयल यांनी केला.
‘फडणवीसांच्या बॅगेचीही तपासणी’
शिवसेना (ठाकरे) पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मनातच संदिग्धता आहे. त्यांना खरोखरच आपल्या बॅगेतील पैसे जाण्याची भीती आहे. बॅग तपासल्यामुळे त्यांचा इतका संताप होण्याचे हेच प्रमुख कारण आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या बॅगेचीही तपासणी झाली होती, अजूनही होते. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या काळात असा भ्रमनिरास पसरवून उपयोग नाही, अशी टीका त्यांनी केली.



