समाजवादी पार्टी हा मूळचा उत्तर प्रदेशातला पक्ष आहे. मात्र, या पक्षानं गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळालं आहे. या पक्षाचे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार असून, भिवंडी पूर्व मतदारसंघात रईस शेख हे सपाचे महाराष्ट्रातील दुसरे आमदार आहेत. राज्यात सपाला ओळख मिळवून देण्यात अबू आझमी यांचा मोठा वाटा आहे. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघ हा अबू आझमी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी यंदा त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत अवघड निवडणूक लढावी लागत आहे. कारण- त्यांच्यासमोर यंदा कडवं आव्हान उभं ठाकलं आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांनी अबू आझमी यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे.
अबू आझमी हे १५ वर्षांपासून मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार असले तरी त्यांनी मतदारसंघात फारशी विकासकामं केली नसल्याचा येथील मतदारांचा, प्रामुख्याने मानखुर्दकरांचा सूर आहे. मानखुर्द-शिवाजीनगर हा मतदारसंघ मुंबईतील सर्वांत अविकसित मतदारसंघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शिवाजीनगरमधील तरुणाईला अमली पदार्थांचा विळखा बसला आहे. या मतदारसंघात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या काही घटना अलीकडच्या काळात समोर आल्या होत्या. नवाब मलिक यांनी हा मुद्दा धरून जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं.



