मुंबई : राज्यात सुरू असलेली विधानसभा निवडणूक राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी उपक्रमासाठी सणासुदीसारखी ठरणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तसेच पोलीस कर्मचारी यांच्या पथकांची ने-आण करण्यासाठी तसेच अन्य कामांसाठी १९ आणि २० नोव्हेंबर रोजी एसटीच्या ९ हजार बस आरक्षित करण्यात आल्या असून याद्वारे एसटीला किमान २७ ते ३० कोटींपर्यंत उत्पन्न मिळणार आहे.
राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी एसटी महामंडळाकडे साध्या बसची मागणी करण्यात आली. यासाठी सुमारे ९ हजार २०० एसटी बसचे आरक्षण करण्यात आले आहे. एसटी महामंडळाने ३१ विभागांतून २०० ते ६०० बस आरक्षित केल्या आहेत.
पुणे विभागातून सर्वाधिक एसटीची मागणी असून सुमारे ६०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमधून सुमारे ५००, सोलापूर ४९०, अहमदनगर ४६८, सातारा ४४९, कोल्हापूरमधून ४५३ बसची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामासाठी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सुमारे ९ हजारांहून अधिक बसगाड्या वापरण्यात येणार आहेत. यातून एसटीला दोन दिवसांसाठी बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळतील, असे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.



