
नागपूर : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्यानजिक ही घटना घडली.
काटोल मतदारसंघात अनिल देशमुखांचे पुत्र सलील हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. प्रचाराच्या अखरेच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदारसंघात प्रचारात सक्रिय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत ते कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटलेल्या दिसून येतात. यासंदर्भात नागपूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले. परंतु, अन्य तपशील देण्यास नकार दिला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाजवळ एकत्र झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. भाजपने ही ‘स्टंटबाजी’ आहे, असा आरोप केला आहे. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपचे काटोल मतदारसंघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.



