मुंबई : राज्यातील प्रचार ‘कटेंगे तो बटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा विविध घोषणांनी गाजत असतानाच, अखेरच्या टप्प्यात मुंबईतील प्रचारात धारावी पुनर्विकास आणि अदानी केंद्रस्थानी राहिले. अदानीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविल्याने भाजपला त्यावर आक्रमक प्रतिवाद करावा लागला.
राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपला, पण शेवटचे दोन दिवस हे अदानीवरूनच गाजले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत ‘एक है तो सेफ है’ हा नारा मोदी, अमित शहा आणि अदानी यांच्या सुरक्षेसाठी असल्याचा चिमटा भाजपला काढला. गांधी यांचे हे वक्तव्य भाजपला चांगलेच झोंबले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.



