महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. त्यामुळे राज्यात कोण सत्ता स्थापन करणार, कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 मतदार संघासाठी नुकतेच मतदान पार पडले असून उद्या त्याचा निकाल जाहीर होत आहे. (Maharashtra Vidhansabha Results 2024)
या विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील दोन मोठी पक्ष फुटली. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाचे आता दोन गट पडले असून दोन्ही गटांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. या 288 मतदारसंघांपैकी अनेक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना तसेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगत आहे.यापैकी काही मतदारसंघ असे आहेत जे जायंट किलर ठरू शकतात. त्यामुळे येथील निकालाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
‘हे’ मतदारसंघ ठरू शकतात जायंट किलर
1 कागल : या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी समरजीत घाटगे यांना संधी दिली आहे. घाटगे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडत तुतारी फुंकली. ते महायुतीविरोधात मैदानात आहेत. या निवडणुकीत समरजीत घाटगे यांच्या विरोधात अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ हे रिंगणात आहेत. कोल्हापूरच्या या जागेच्या निकलाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
2. सिल्लोड सोयगाव : सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून सुरेश बनकर हे मैदानात आहेत. हा मतदार संघ ही या विधानसभेत जायंट किलर ठरण्याची शक्यता आहे. (Maharashtra Vidhansabha Results 2024)
3. माहीम : या मतदारसंघाकडे यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. माहीम मधून प्रथमच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम मध्ये यावेळी तिरंगी लढत बघायला मिळत आहे. येथे मनसेकडून अमित ठाकरे तर महाविकास आघाडी कडून महेश सावंत व शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
4. कराड दक्षिण : या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज चव्हाण आणि महायुतीकडून भाजपचे अतुल भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. हा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण आणि कॉँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे येथे कोण बाजी मारणार ते पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे.
6. सांगोला : या विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून ‘काय झाडी काय डोंगर’ फेम शहाजीबापू पाटील तर महाविकास आघाडी कडून दीपक साळुंखे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख देखील येथे निवडणूक मैदानात आहेत.
8. परळी : बीडच्या परळी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष झाला आहे. येथे अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे तर शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख निवडणूक रिंगणात आहेत.



