ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी १६ जागांवर महायुतीने विजय मिळविला, तर केवळ दोनच जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. भाजपने ९ पैकी ९, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ पैकी ६ जागा तर अजित पवार यांनी २ पैकी १ जागा जिंकली आहे. महाविकास आघाडीला दोनच जागा मिळाल्या असून ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेला जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजपने नऊ जागा लढविल्या आणि सर्वच जागांवर विजय मिळविला.
भिवंडी पश्चिमेत महेश चौगुले, मुरबाडमध्ये किसन कथोरे, उल्हासनगरमध्ये कुमार आयलानी, कल्याण पूर्वेत सुलभा गायकवाड, डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, मिरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता, ठाणे शहरमध्ये संजय केळकर, ऐरोलीत गणेश नाईक, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांचा विजय झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ जागा लढविल्या. त्यापैकी भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे, अंबरनाथमध्ये डॉ. बालाजी किणीकर, कल्याण पश्चिममध्ये विश्वनाथ भोईर, कोपरी-पाचपाखाडीत एकनाथ शिंदे, ओवळा-माजिवडामध्ये प्रताप सरनाईक, कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे विजयी झाले.
●उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन जागा लढविल्या होत्या. त्यापैकी शहापूरमधील उमेदवार दौलत दरोडा हे विजयी झाले, तर कळवा-मुंब्रामधील उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव झाला.
●पालघर जिल्ह्यातील ६ विधानसभा जागांपैकी ५ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे तीनही आमदार पराभूत झाल्याने या पक्षाचा गेल्या ३५ वर्षांपासून असलेला दबदबा संपुष्टातला आला. माकपचे विद्यामान आमदार विनोद निकोले यांनी डहाणूची जागा राखली.



