इंदापूर : राज्याचे लक्ष लागलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला बंडखोरीचा फटका बसला. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झालेल्या या मतदारसंघात बंडखोर उमेदवार प्रवीण माने यांनी तब्बल ३७ हजार ९१७ मते घेतल्याने हर्षवर्धन पाटील यांना दत्तात्रय भरणे यांच्याकडून १९ हजार ४१० मतांनी पराभूत व्हावे लागले.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यामान आमदार दत्तात्रय भरणे यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आव्हान होते. त्यातच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षामध्ये बंडखोरी झाल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
बारामतीलगतच्या या मतदारसंघात निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार यांचे समर्थक आमदार दत्ता भरणे यांच्याकडे जाणार असल्याने नाराज हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पवार यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केल्याने शरद पवार यांच्या पक्षात नाराजी उमटण्यास सुरुवात झाली. त्यातून सोनाई उद्याोग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी ‘इंदापूर परिवर्तन विकास आघाडी’च्या माध्यमातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली. पाटील विरोधक एका बाजूला एकवटले असतानाच त्यांना स्वकियांकडूनही विरोध सुरू झाला. त्यामुळे पाटील यांची राजकीय कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले होते.
परिवर्तन विकास आघाडीतील अप्पासाहेब जगदाळे यांनी ऐन वेळी राष्ट्रवादी (अजित पवार ) पक्षात प्रवेश करून भरणे यांना पाठिंबा दिला. परिवर्तन विकास आघाडीत फूट पडल्याने इंदापूर शहरावर मजबूत पकड असलेले शहा कुटुंबातील भरत शहा, मुकुंद शहा, माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी निवडणुकीत अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. त्याचा परिणाम हर्षवर्धन पाटील यांचा पराभव होण्यात झाला. या निवडणुकीत जातीय समीकरणेही महत्त्वाची ठरली. पाटील आणि माने हे मराठा समाजातील उमेदवार असल्याने या मतांची या दोघा उमेदवारांत विभागणी झाली.