: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला. लाडकी बहीण आणि इतर सरकारी योजनांच्या बळावर महायुती सरकारने मोठा विजय प्राप्त केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे त्यांना अधिक जागा जिंकता आल्या, असा आरोप महायुतीमधील नेत्यांनी केला होता. त्यामुळे महायुतीकडून बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, अशा घोषणा देण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांचा मविआला फार लाभ झाला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात ३८ विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांचे प्राबल्य आहे. ३८ पैकी २२ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे, तर मविआला केवळ १३ जागा मिळाल्या आहेत.

मुस्लीम मतदारांच्या विभाजनाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे. मागच्या वेळेस ३८ पैकी ११ जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाला केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.

भाजपाला अधिक फायदा

२०१९ च्या तुलनेत या ३८ जागांवर भाजपाला यावेळी लाभ झाला आहे. २०१९ साली त्यांना ११ मतदारसंघात विजय मिळाला होता. यावेळी हा आकडा वाढून १४ झाला आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाला सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. इतर तीन जागांवर समाजवादी पक्षाचे दोन तर एमआयएम पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, विधानसभेच्या निकालावरून मुस्लीम समाजाला एकगठ्ठा मतदानाचे आवाहन करत करण्यात मौलवी अपयशी ठरल्याचे दिसते. भाजपाने व्होट जिहादचा आरोप केल्यानंतर मुस्लीम समाज महायुतीविरोधात मतदान करेल, असा आरोप करण्यात येत होता.

एनडीटीव्हीने भाजपाचे नेते विनय सहस्त्रबुद्धे यांची यावर प्रतिक्रिया घेतली आहे. त्यांनी विरोधकांनी केलेले ध्रुवीकरणाचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, एक है तो सेफ है, ही घोषणा सर्व समुदायांसाठी होती. मतदारांनी महाविकास आघाडीच्या ध्रुवीकरणाच्या झिडकारले आणि विकासासाठी एकत्र येऊन मतदान केले. आमच्या एक है तो सेफ है, या घोषणेत सर्व समुदायांचा समावेश होता.

मुस्लीम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सलीम सारंग म्हणाले की, ध्रुवीकरणाच्या राजकारणाला कोणताही थारा दिला जात नाही. लोक विकासाचे मुद्दे समोर ठेवून मतदान करत आहेत. मुस्लीम बहुल मतदारसंघात पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये दिग्गज नेत्यांची नावे आहेत. राष्ट्रवादीचे नवाब मलिक, झीशान सिद्दीकी आणि काँग्रेस पक्षाचे आरिफ नसीम खान यांचा या यादीत समावेश आहे.