मुंबई : महायुतीच्या वतीने सत्ता स्थापनेचा दावा करताना २३६ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले. त्यानंतर राज्यपालांनी अधिकृतपणे शपथविधीचे निमंत्रण दिले. यानुसार उद्या, गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानात शपथविधी पार पडणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह फडणवीस यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.
सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या पत्रावर भाजप १३२, शिवसेना (शिंदे) ५७, राष्ट्रवादी (अजित पवार) ४१, जनसुराज्य शक्ती २, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, राजर्षी शाहू विकास आघाडी, अपक्ष प्रत्येकी एक अशा सहा अशा २३६ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.एवढे निर्विवाद बहुमत कोणत्याच पक्षाला वा आघाडीला आतापर्यंत मिळाले नव्हते.
सत्ता स्थापनेचा दावा केल्यावर राज्यपाल राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना शपथविधीचे अधिकृत निमंत्रण दिले. कारण यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीची घोषणा करून औचित्याचा भंग केला होता. आझाद मैदानात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी समारंभ पार पडणार आहे.



