मुंबई महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडकी बहीण योजना, पुढील पाच वर्षांतील सरकारची धोरणं आणि राज्याचा विकासावर भाष्य केलं. महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत विरोधकांशी शत्रूत्व नसेल हेही त्यांनी सांगितलं. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही फडणवीसांनी संयमी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी ३१ जुलैच्या दिवशी मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात एक मेळावा घेतला होता. या मेळाव्यात ते म्हणाले होते, “मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस डाव आखत होते. मात्र मी सगळं काही सहन करुन उभा राहिलो आहे. आता एक तर तू राहशील किंवा मी राहीन. गीतेमध्येही हेच आहे. अर्जुनाने पाहिलं की त्याच्यासमोर त्याचे नातेवाईकच उभे आहेत तेव्हा त्यालाही यातनाच झाल्या होत्या. मलाही यातना होत नसतील का?”
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर गुरुवारी फडणवीसांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रात जो राजकीय संवाद आहे, विशेषतः दाक्षिणात्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात हा फरक आहे, महाराष्ट्रात राजकीय संवाद संपलेला नाही. पण अनेक राज्यामध्ये दोन राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये एवढा विसंवाद असतो की जणू खून के प्यासे असं पाहायला मिळतं. महाराष्ट्रात तशी परिस्थिती कधीच नव्हती आणि पुढेही राहू नये हा माझा प्रयत्न असेल” यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या ‘एक तर तू राहशील किंवा मी राहीन’ या वक्तव्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, “राजकारणात तेही राहतील आणि मीही राहीन, सगळेच राहतात”.


