जालना : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी म्हणजेच काल (05) महायुतीचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महायुतीचा शपथविधी पार पडताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांनी फडणवीस सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. सरकार स्थापन झाल्याबद्दल त्यांनी महायुती सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सरकारने 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात. नाहीतर मराठे पुन्हा एकदा आंदोलनात उभे राहून सरकारला परेशान करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
5 जानेवारी पर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, असा नवा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहेत, असे म्हणत आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारने 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाही तर मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करणार आहेत. मराठा आणि कुणबी एक आहे हा विषय मार्गी काढायचा. 2004 च्या अध्यादेशात दुरुस्ती करायची, यांसह सात-ते आठ मागण्या आम्ही याआधीच सरकारकडे केलेल्या आहेत. त्यांनी त्या पूर्ण मार्गी काढाव्यात. नाहीतर सरकारला पुन्हा एकदा मराठ्यांना सामोरे जावे लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच, आता गुर्मीत आणि मस्तीत जगायचे नाही. जनतेने कौला दिलाय म्हणून नाटकं करायचे नाहीत. समाजाला सांभाळायला शिका, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.



