
मुंबई : एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? याबाबत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर काल पार पडलेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधीची तयारी भाजप केली होती, असे त्यांनी म्हटले. आता यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले होते. यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता. मात्र, काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मोठा दावा केला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावीच लागणार होती. त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती. माझ्याकडे पक्की माहिती आहे, मी महितीशिवाय बोलत नाही. सरकारमध्ये आमची माणसं आहेत. आमचे हितचिंतक असतात. त्यांच्या पक्षातसुद्धा आमचे हितचिंतक आहेत. दाबदबावाचा अडेलतट्टूपणा असाच कायम राहिला असता, तर त्यांच्याशिवाय पुढे जा, असे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने कळवलं होतं, असा दावा संजय राऊत यांनी केला.
शिरसाट, देसाई यांचे राऊतांना प्रत्युत्तर
संजय राऊत यांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, विरोधक काय बोलतात याकडे लक्ष देत नाही. हे जे डोम कावळे आहे, यांनी असेच बोलत राहावे. आम्ही आमचे काम करत राहू. आम्ही काय करावे याची चिंता तुम्ही करू नका. संजय राऊतांच्या म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण आमचं सर्व ठरलं होतं, शिंदे यांनी आमदारांच्या शब्दाला मान ठेवला. फडणवीस यांचा मान राखला, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. तर शंभुराज देसाई यांनी तुमच्याकडे हितचिंतक असतील तर त्यांची नावे सांगा, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.



