मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील विधानसभेच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवारांची बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी महायुतीतील मित्र पक्षांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचा मुद्दा अजित पवारांसमोर मांडला. पवारांनी यावेळी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसंच पराभव झाला असला तरी पक्ष तुमच्या पाठीशी पूर्ण क्षमतेनं उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी उमेदवारांना दिली.
बैठकीला कोण-कोण उपस्थित : पराभूत उमेदवारांच्या बैठकीत त्यांचे विचार जाणून घेऊन पक्ष अधिक बळकट करण्यासाठी पवारांनी पावले उचलण्यास प्रारंभ केलाय. शुक्रवारी (6 डिसेंबर) झालेली बैठक हा त्याचाच एक भाग होता. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पुढील सर्व निवडणुकीत पक्षाला यश मिळेल यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी पवारांनी दिल्या. देवेंद्र भुयार, अतुल बेनके, राजेश पाटील यांसह अनेक पराभूत उमेदवार या बैठकीला उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळं शरद पवारांच्या पक्षातून बाहेर पडलेल्या अजित पवारांच्या पक्षालाच मतदारांनी खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणून ओळख मिळवून दिलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा नव्यानं राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवून देण्याचं उद्दिष्ट अजित पवारांनी डोळ्यासमोर ठेवल्याचं बघायला मिळतंय.