मुंबई : भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळं दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. उद्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. एकमेव अर्ज असल्याने राहूल नार्वेकरांच्या नावाची उद्या घोषणा होणार आहे.
राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, विरोधी पक्षांकडूम एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळं राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार हे निश्चित मानले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही आज दुपारी 12 वाजेपर्यंत होती. या मुदतीत मविआकडून एकही उमेदवारी अर्ज आला नाही. त्यामुळं नार्वेकरांची बिनविरोध निवड होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला. मित्रपक्षांसह महायुतीचं संख्याबळ 236 इतकं झालं आहे. महायुतीकडे मोठं संख्याबळ असल्यानं विधानसभा अध्यक्ष तीन पक्षांमध्ये कुणाकडे जाणार याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, विधानसभा अध्यक्षपद पुन्हा एकदा भाजपकडे जाणार आहे. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार हे निश्चित झालं आहे.