पुणे : आरोग्य सेनेतर्फे आयोजित ११ व्या स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (स्पिफ) तथागत घोष दिग्दर्शित ‘इफ’ने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावित बाजी मारली. तर, ह्यझोयाह्ण या लघुपटासाठी सयांतन मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख व ‘स्पिफ’चे संस्थापक-संचालक डॉ. अभिजित वैद्या यांच्या हस्ते महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. चित्रपट दिग्दर्शक गगनविहारी बोराटे या वेळी उपस्थित होते. कल्लोळ मुखर्जी दिग्दर्शित ‘माईकड्रॉप’ने ज्युरी अॅवॉर्ड पटकाविले. उत्कृष्ट पटकथा पुरस्कारासाठी ‘वेणी’, उत्कृष्ट कथा पुरस्कारासाठी ‘दि फर्स्ट फिल्म’ आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ‘थर्सडे स्पेशल’ या लघुपटांची निवड करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय वर्गवारीत स्पेनचे ल्युसिया जी. रोमेरो दिग्दर्शित ‘क्युरा स्याना’ हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. इंडोनेशियाचे कोझी रिझाल यांना ‘बासरी अँड सलमा इन ए नेव्हर एंडिंग कॉमेडीह्ण या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर फिलिपाईन्सचे दिग्दर्शक सम मानकसा यांना ‘क्रॉस माय हार्ट अँड होप टू डाय’साठी ज्युरी अॅवॉर्ड देण्यात आले. स्मिता पाटील सर्वोत्कृष्ट महिला चित्रकर्ती पारितोषिक निशी दुगर यांना ‘अनार दाना’ या लघुपटासाठी प्रदान करण्यात आले.



