पुणे : ‘राजकीय हस्तक्षेप नसेल, तर पोलिसांना काम करणे अजिबात अवघड नाही. पुण्यात कोणाचाही राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही. अधिकाऱ्यांसाठी वाहने किंवा अन्य सुविधा दिल्या जातात. असे असूनही कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी कमी पडतात, असे माझे मत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पवार यांनी गुरुवारी पुण्याशी संबंधित विविध विषयांवर बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत विचारले असता, त्यांनी वरील विधान केले. ‘या अधिकाऱ्यांना जमत नसेल, तर त्यांनी आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, असे स्पष्ट सांगावे. दुसरे चांगले अधिकारी आणून गुन्हेगारीला चाप बसवण्याचे काम करण्यात येईल असेही पवार म्हणाले.
ते म्हणाले, ‘पुण्याच्या विकासासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी असे काही अधिकारी आणले आहेत. आणखी काही अधिकारी आणायचे आहेत. वडगाव शेरीवगळता शहर, जिल्ह्यात महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता जबाबदारी आम्हा लोकांची आहे. जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ नये याची जबाबदारी आम्ही घेणार असून, त्यात कमी पडणार नाही.’
‘पिंपरी चिंचवड महापालिकेत ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण करण्यात आले. त्यात तीन लाख २३ हजार मालमत्ता नोंद नसलेल्या, तसेच कमी मोजमाप असलेल्या सापडल्या. नवीन तंत्रज्ञानाद्वारे कर भरणे सुसह्य व्हावे. पिंपरी-चिंचवडमधील ७२ टक्के नागरिक ऑनलाइन कर भरतात. त्यामुळे पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनीही पुणे महापालिकेत याचे अनुकरण करावे,’ अशी सूचना पवार यांनी केली.



